महाराष्ट्र हेडलाईन्स : मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. नापिकी मुळे बँकेचे, खाजगी सावकाराचे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. चिंताग्रस्त झालेले शेतकरी बराच वेळेला टोकाचे पाऊल उचलतात. आपली जीवन यात्र संपवतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भरभक्कम आधाराची गरज असते. त्यामुळे विविध संघटनांकडून सातत्याने कर्जमाफी करावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. दरम्यान, वज्रमूठ-सामाजिक संघटनेने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी संघटनेने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. याप्रसंगी शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी (loan waiver) तात्काळ दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती राज्यातील वज्रमूठ-सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे धोरण राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. (One year loan waiver will be given to farmers immediately, Chief Minister assured)
मुख्यमंत्र्यांसमोर मांडला एक विशेष प्रस्ताव :
राज्यातील सद्यःपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वज्रमुठ-सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. ३०) सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, कामगार नेते अभिजित राणे उपस्थित होते. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर दहा प्रमुख मागण्या व एक विशेष प्रस्ताव मांडला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, की ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, त्या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात येतील.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा :
चर्चेवेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, चंद्रशेखर विसे, सुनील कदम, अविनाश कदम, अमोल शिंदे, भारत पिंगळे, संकेत पिंगळे, दशरथ कपाटे, आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
महत्त्वाची चर्चा :
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ७०० कोटींचा निधी, तत्काळ वितरित सारथी संस्थेस भरघोस आर्थिक मदत, स्व. अण्णासाहेब जावळे-पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.