महाराष्ट्र हेडलाईन्स : देशात काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्वीच पावसाने हाहाकार केला आहे. परंतु, या पावसाचे प्रमाण असमान असल्याचे चित्र आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, पूर परिस्थिती निर्माण झाली,तर काही भागांमध्ये अजूनही बळिराजा चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे, मात्र मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. लघु मध्यम प्रकल्प तहाणलेली आहेत. तर, दुसरीकडे हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे आता चिंता वाढली आहे. ( IMD Weather Update Heavy Rain Warning Across The Country In August And September)
हे पण वाचा : Maharashtra Rain : हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज: आता 'या' तारखांना पडणार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस...
भारतातील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता :
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याचं भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी म्हटलं आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे पूर्वोत्तर भारत, पूर्वोत्तर भारताला लागून असलेली काही राज्य, तसेच मध्य भारतातील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आधीच कमी पाऊस झाला आहे, त्यानंतर पुढील दोन महिने देखील मध्य भारतात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं आता चिंतेत आणखी भर पडली आहे.
देशभरात 6 टक्के अधिक पाऊस :
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 1 जून 31 जुलै म्हणजे आजपर्यंत देशात 474.3 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर 445.8 मिमी एवढा सामान्य पाऊस मानला जातो. म्हणजे यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा आतापर्यंत देशभरात 6 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज :
हिमाचल प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान पुढील दोन महिने काही राज्य वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.परंतु त्यापूर्वी पुढील दोन आठवडे देशभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रातही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र ही स्थिती दोन आठडे किंवा त्यापेक्षा थोडा अधिक काळ राहू शकते, त्यानंतर पाऊस पुन्हा सामान्य होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अद्यापही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही, त्यातच पावसाचा जोर ओसरल्यास शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट :
प्रादेशिक हवामान विभागाच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. ३ व ५ ऑगस्ट रोजी या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.
जिल्ह्यात आजच्या तारखेत अपेक्षित पाऊस ४०७.७० मिमी असून प्रत्यक्षात ३४८ . ०० मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ८५ इतकी आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाची ५९ मिमी तूट निर्माण झाली आहे. गतवर्षी आजच्या तारखेत ११६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मोठ्या पावसाची आणखी आवश्यकता आहे.
'विष्णुपुरी'त ८९ टक्के जलसाठा :
नांदेड मधील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प शुक्रवारी ८९ टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सर्तक रहावे, अशा सूचना नांदेड जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.