महाराष्ट्र हेडलाईन्स : ट्रॅक्टर चोरीची फिर्याद दाखल करण्यासाठी १२ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर भिमराव तिडके, असे संशयित आरोपीचे नाव असून ते नांदेड ग्रामीण ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
यातील तक्रारदार यांनी फायनान्सकडून ट्रॅक्टर घेतला होता. तो ट्रॅक्टर एजन्सीचे मालक यांनी तक्रारदाराचे संमती शिवाय ओढून नेला म्हणून चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाला अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशी करीता नांदेड ग्रामीण ठाणे येथे पोलीस हवालदार तिडके यांचेकडे होता. त्या अर्जावर कारवाई करण्यासाठी तक्रारदार हे पोलीस कर्मचारी तिडके यांना भेटले. तेव्हा पोलीस कर्मचारी तिडके यांनी ‘‘पैसे देवून साहेबांना भेटाव लागते, तरच कारवाई होते. नाही तर असेच अर्ज पडून राहतात’’ असे म्हणून अर्जदार यांच्याकडे ठाणेदारांना सांगून फिर्याद दाखल करण्यासाठी १२ हजार रूपयांची मागणी केली.
तीन वेळा लाचलुचपत रचला होता सापळा :
दरम्यान तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिडके यांच्यावर सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांना पाठविले होते. परंतु तिडके हे मिळून आले नाहीत व त्यांचा मोबाईल फोन स्विच ऑफ होता.
त्यामुळे नमूद लाच मागणी पडताळणी कार्यवाहीमध्ये सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून सोमवारी ज्ञानेश्वर भिमराव तिडके यांचेविरूध्द नांदेड ग्रामीण ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली आहे.
अधिकाऱ्याने फिर्याद देण्याची पहिलीच घटना :
विशेष म्हणजे, लाचेच्या मागणीचे हे प्रकरण तीन महिन्यापासून सुरू होते. या वेळी एसीबीने तीन वेळा सापळा रचून कारवाईचे प्रयत्न केले होते. सदर लाच प्रकरणात तक्रारदाराचा शोध घेऊनही तो सापडला नसल्याने अखेर या कारवाईतील अधिकारी पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली. एखद्या अधिकाऱ्याने स्वतःहून फिर्याद देण्याची नांदेडच्या एसीबीच्या कार्यालयातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.