महाराष्ट्र हेडलाईन्स : आज एकीकडे प्रत्येक पालकांना वाटते आपला पाल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात भवितव्य घडवावे. पाल्याची इच्छा नसतानाही त्याला या क्षेत्राकडे वळविले जाते. या दोन्ही क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत, पण निवड करताना विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता विचारात घेणे महत्त्वाचे आहे. नेमके हेच लक्षात घेऊन अविनाश व सिमा नाव्हेकर यांनी आपल्या दोन्ही पाल्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे याचे स्वतंत्र्य दिले. परिणामही चांगला झाला असून त्यांचा मुलगा ऋषिकेश हा सीए फाउंडेशन (CA Foundation) परीक्षेत ४०० पैकी ३५१ गुण घेत देशात सातव्या रँकवर यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ऋषिकेश नियमित अभ्यासासोबतच मैदानी खेळ व सोशल मीडिया मोबाईलचाही तितकाच वापर करत होता. अभ्यासाच्या वेळी मात्र, त्याचा मोबाईल कायम तो दूर ठेवत होता. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत समतोल राखत ऋषिकेशने फाउंडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. (Commendable...! He kept his mobile phone away while studying, which is why Rishikesh Navhekar, a student from Nanded, secured seventh rank in the country in this exam.)
ऋषिकेश याचे वडील अविनाश नाव्हेकर हे नांदेड शहरातील एका खाजगी शाळेत लिपिक तर आई सीमा या याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ऋषिकेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण पिनॅकल इंग्लिश स्कूल येथे तर, १२ वी चे शिक्षण ब्लू बेल्स जुनियर कॉलेज येथे झाले. इयत्ता दहावी व बारावी मध्येही (वाणिज्य शाखा) त्याने ९६ टक्के गुण घेत यश मिळवले.
दिवसभरातील चार तास मनातून अभ्यास
सकाळी ८ ते १२ दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये त्याची सीए फाउंडेशनची शिकवणी होत होती. मधल्या वेळेमध्ये मैदानी खेळ, कुटुंबासमवेत, सोशल मीडिया व मोबाईल हाताळत. रात्री मात्र, घरातील सर्व सदस्य झोपल्यानंतर तो मोबाईल दोन हात दूर ठेवून संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करत होता. साधारण दिवसभरातील चार तास तो मनातून अभ्यासाला बसत होता. त्याच्या पालकांनी त्याला अभ्यासासाठी कधीच जबरदस्ती केली नाही. मनात येईल तेव्हा तो स्वतःहून अभ्यास करत होता. त्यामुळे त्याला कोणतीच गोष्ट कठिण वाटत गेली नाही. समतोल राखल्याने अभ्यास करताना इतर गोष्टीकडे लक्ष विचलित झाले नाही, त्यातच आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची संधी मिळाल्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो असे ऋषिकेशने सांगितले.
करिअरसाठी आवडीच्या क्षेत्र निवडा
सर्वप्रथम आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात आपण करिअर केले पाहिजे. तसेच मनात येईल तेव्हा अभ्यासाला बसले पाहिजे. जबरदस्ती कामाची नाही. सातत्य ही तितकेच महत्त्वाचे असून समतोल राखता आला पाहिजे.
- ऋषिकेश अविनाश नाव्हेकर, नांदेड