महाराष्ट्र हेडलाईन्स : नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. नांदेडकरांची तहाण भागविणाऱ्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात ९५ टक्के साठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाने सायंकाळी ६.१० वाजता १७ क्रमांकाचा तर ९.१० वाजता १६ क्रमांकाचा दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रात ८७२ क्युमेक्स (३०, ७९४क्युसेस) पाण्याचा विसर्ग केला. याप्रसंगी प्रशासकीयस्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना दिल्या आहेत. तसेच नांदेड शहरात जोरदार तर इतर तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी असल्यामुळे सध्या नुकसानकारक स्थिती कुठेही नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
निजामपूर ते बामणी वाहतूक बंद :
अर्धापूर तालुक्यातील बामणी येथील नाल्यावरून पाणी भरून वाहत आहे. त्यामुळे निजामपूर ते बामणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच याच तालुक्यातील सांगवी खुर्द येथील पुलालगत पाणी जात आहे गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
किनवट तालुक्यात सर्वाधिक पाऊस :
मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दररोज जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे. शनिवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता नोंदला गेलेला पाऊस २५.७० मि.मी. एवढा झाला. यावर्षी मुखेड १९०.६० आणि देगलूर १९६.१० या दोन तालुक्यात २०० मिमी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात सर्वाधिक ४९७.१० मि.मी. पाऊस झाला. त्या खालोखाल माहूरमध्ये ४६३.१० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात आज रोजी अपेक्षीत पाऊस ३६०.३० मिमी असून प्रत्यक्षात २९६.८० मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या ६३ मिमी पावसाची तुट असली तरी, आजच्या पावसाने ती गाठली जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत सरासरी ४१०.८० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
नाल्याचे पाणी शिरले घरात....
शहरातील आनंदनगर, वसंतनगर, मगनपूरा, श्रावस्तीनगर, तेहरानगर, सादतनगर, नवा मोंढा, गोकुळनगर, विष्णूनगर, श्रीनगर, बाफना रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरातील रस्त्याची झालेली दूरवस्था व त्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना जलमय रस्त्यातून मार्ग शोधावा लागला. अनेक मुख्य रस्त्यासह हिंगोली गेट, लालवाडी पुलाजवळील रस्ता जलमय झाला तर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही भागातील नाल्या तुंबल्याने रस्त्यावरच पाणी साचले होते. हेच पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरले होते.
तालुकानिहाय पाऊस (मिली मीटरमध्ये) :
शुक्रवारी (दि.२५) सकाळी ८.३० ते शनिवारी (दि.२६) सकाळी साडे आठ या २४ तासात नांदेड २४.४०, बिलोली ४६.३०, मुखेड २०.२०, कंधार ३५.५०, लोहा ३३.६०, हदगाव १८.००, भोकर २३.६०, देगलूर १५.३०, किनवट १९.७०, मुदखेड ३६.६०, हिमायतनगर २२.५०, माहूर १०.६०, धर्माबाद २१.८०, उमरी २५.५०, अर्धापूर २९.८०, नायगाव ३३.६० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.