महाराष्ट्र हेडलाईन्स : राज्यात केळी उत्पादनात जळगावनंतर मराठवडयात नांदेड जिल्हयाचा नंबर लागतो. नांदेडसह शेजारील हिंगोली व परभणी जिल्हयातील काही भाग असे जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीचे आहे. यातून वर्षाकाठी जवळपास सात लाख ५० हजार टन केळीचे उत्पादन होते. नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात प्रचंड प्रमाणात केळी या पिकाची लागवड केली जाते. नांदेड जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी मराठवाडयात प्रसिद्ध आहे. येथील अर्धापूरी केळी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. आफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, दुबई या देशात येथील केळीची निर्यात होते. या सर्व भागातील केळीची व्यापार पेठ म्हणून नांदेड जिल्हयातील अर्धापूर प्रसिध्द आहे.
क्विंटलला २२०० रूपयांचा दर :
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून देशांतर्गत नांदेडमधील केळीला चांगला भाव मिळाल्याने बाहेर देशातील ९० टक्के निर्यातीत घट झाली आहे. सध्या हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तरप्रदेशात नांदेडच्या केळीला मागणी वाढली असून क्विंटलला २२०० रूपये दर मिळाला आहे. (Demand for Nanded bananas has increased in Haryana, Delhi, Chandigarh, Uttar Pradesh and the price has reached Rs 2200 per quintal.) याठिकाणी रोज ४० ते ५० गाडयांची रोज निर्यात होत आहे. तर, स्थानिक बाजारपेठेतही १८०० ते १९०० रूपये क्विंटलने केळीची विक्री होत आहे. पुढील काही दिवस सण उत्सवांचे असल्याने दर तेजीत राहतील, असे व्यापा-यांकडून सांगण्यात येत आहे.
अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने केळीचे मोठे नुकसान :
मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने केळीचे मोठे नुकसान झाले होते. घड लगडलेली झाडेच्या झाडे जमीनदोस्त झाली होती. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यावेळी केळीचे भाव ठोक बाजारात १२०० रुपये क्विंटलपर्यंत दर घसरले होते. सध्या मागील १५ दिवसांत पुन्हा भाव वधारला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत २२०० रुपये तर, स्थानिक बाजारपेठेत १८०० ते १९०० रूपये क्विंटल या दराने केळीच्या बाजारात व्यवहार होत आहेत. स्थानिक बाजाराच चांगला भाव मिळत असल्याने ९० टक्के बाहेर देशातील निर्यातीत घट झाली आहे.
सण-उत्सवामुळे दर तेजीत राहतील :
मागील सुमारे १५ दिवसांपासून केळीच्या भावात तेजी पहायला मिळते आहे. सध्या देशांतर्गत दिल्ली, हरियाणा, चंदीगड येथे केळीला २२०० शे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे. तसेच बाहेर देशात पाठवण्यासारखी सध्याच्या केळीची गुणवत्ता राहिली नाही. त्यातच बाहेर देशातील दर देशांतर्गत बाजारपेठेत मिळत असल्याने इराण, इराक, ओमेन, कतर, दुबई या भागातील केळी ९० टक्के निर्यात कमी झाली आहे. सण-उत्सवामुळे पुढील काही दिवस केळीचे दर तेजीत राहतील, असे व्यापारी नंदकिशोर देशमुख यांनी सांगितले.