महाराष्ट्र हेडलाईन्स : मजुरांच्या तीव्र अभावामुळे शेतकरी चिंतेत असताना, अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत दोनवाडा येथील सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी श्रीकृष्ण पाटील झटाले यांनी आपल्या कल्पकतेने या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी ट्रॅक्टरला वखर जुंपून एक 'देशी जुगाड' तयार केला असून, याच्या मदतीने ते कमी वेळात अधिक शेतीची वखरणी करत आहेत. म्हणतात ना घंटो का काम मिनटो में.. तसेच काहीसे सरपंच यांनी केले आहे. (ट्रॅक्टरला वखर जुंपून केला देशी जुगाड, तासांची वखरणी केली मिनिटांत...) ('Desi Jugaad' by Sarpanch (farmer) Shrikrishna Jatale of Donwada: An innovative experiment to overcome the shortage of laborers!)
ट्रॅक्टरच्या साहाय्याने वखरणी यंत्राचा प्रभावी वापर :
सध्या शेती कामांसाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत, वेळेवर शेतीची कामे पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. याच पार्श्वभूमीवर, श्रीकृष्ण पाटील झटाले यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करत एक अभिनव प्रयोग केला आहे. त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वखरणी यंत्राचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि त्यातूनच हा 'देशी जुगाड' साकारला. या जुगाडाला पण थोड्या मजुराची गरज भासते पण त्यासाठी सुद्धा स्थानिक मजुर मिळे ना...! म्हणून इथल्या सरपंच शेतकऱ्याला मध्य प्रदेश मधुन मजुर आणून शेतीची कामे वेळेवर पूर्ण करावे लागत आहेत.
देशी जुगाडमुळे शेती कामांना गती :
या जुगाडामुळे जिथे अनेक तास मजुरांच्या मदतीने काम करावे लागते, तिथे काही तासांतच मोठ्या क्षेत्राची वखरणी करणे शक्य झाले आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असून, शेती कामांना गती मिळाली आहे. श्रीकृष्ण पाटील यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. केवळ सरपंचच नव्हे, तर एक शेतकरी म्हणून त्यांनी दाखवलेली ही दूरदृष्टी आणि प्रयोगशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे.
शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह :
श्रीकृष्ण पाटील झटाले यांच्या या प्रयत्नामुळे, केवळ त्यांच्याच शेतीत नव्हे तर संपूर्ण दोनवाडा आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी असे अभिनव प्रयोग निश्चितच दिशादर्शक ठरतील.