महाराष्ट्र हेडलाईन्स : अडत्यांना खरेदीदार दोन अडीच महिने पैसे देत नसल्याने आडते शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाहीत म्हणून अडत्यांनी आज(दि.१५)पासून लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऐनवेळी आलेल्या शेतकऱ्यांची हळद बीटात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
शेतकऱ्यांनी मांडली व्यथा...
संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव करायचे नाही आम्हाला वेळेवर व नियमानुसार पैसे पाहिजे म्हणत सभापतीच्या दालनात शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला. सभापती संजय देशमुख लहानकर संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, निलेश देशमुख, ज्ञानेश्वर राजेगोरे, गजानन कदम यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून लोकप्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. मोंढ्यात होणारी अडत्यांची व शेतकऱ्यांची पिळवणूक नवनाथ दर्यापूरकर शिवाजी वासरीकर, राजू सावकार पालदेवार,विठ्ठल देशमुख, गणेशराव वासरीकर, राम राजेगोरे, संतोष कदम, दीपक शिंदे, बंटी शिंदे यांनी मांडली. या अगोदरही अनेक वेळा व्यापारी अडते आणि प्रशासनात चर्चा सामंजस्याने काही तोडगे काढले होते परंतु खरेदीदार चार आठ दिवसातच बदलतात, त्यामुळे नेहमीच वाद निर्माण होत आहेत.
सोयाबीन, हळदीची आवक झाली कमी :
वसमत येथील व्यापारी अगोदर पंधरा दिवसात सर्व अडत्यांच्या दुकान वर चेक आणून द्यायचे परंतु नांदेडच्या व्यापारी उशिरा पेमेंट देऊ लागल्यामुळे त्यांनीही आता नांदेडच्या खरीदराबरोबरच दीड-दोन महिन्यांनी पैसे देण्याची भूमिका घेतली आहे. तेथील काही खरेदीदारांच्या दहशतीमुळे बाहेरचे खरेदीदार व्यापारी नांदेडला येणे बंद झाले आहेत. दोन अडीच महिन्याने पैसे, पावणेचार किलो पर्यंत कट्टी, पंधरा दिवस वजन न करने, आता तर वीस पंचवीस दिवसानंतर तीन रुपये काटून पैसे देणे, यामुळे नांदेडच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन, हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
सभापती व संचालकांना घेराव घालून ठिय्या :
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना दोन अडीच महिने पैसे मिळत नसल्याने आज (दि.१५) संतप्त शेतकरी व अढत्यांनी लिलाव बंद केला. दरम्यान, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या कार्यालयात सभापती व संचालकांना घेराव घालून ठिय्या केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराने भांबावून गेलेले सभापती संजय लहानकर, संचालक बबनराव बारसे यांनी सोमवारपर्यंत सर्व मागील देणे देऊन सोमवारपासून ठरल्यानुसार नियमित पेमेंट करण्यास खरेदीदारांना भाग पाडू, असे आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन स्थगित केले. सोमवारपासून ठरल्यानुसार नियमित वेळेवर पैसे न दिल्यास शेतकरी व अडत्यांच्या वतीने बेमुदत लिलाव बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नियमावर बोट ठेवण्यास भाग पाडू नका....
नियमानुसार शेतकऱ्यांना २४ तासात पैसे मिळणे बंधनकारक आहे तरी पण प्रशासन, लोकप्रतिनिधी, खरेदीदार व्यापारी, आडते यांच्या समन्वयातून निघालेल्या तोडग्यानुसार सुद्धा खरेदीदार वागत नाहीत त्यामुळे मोंढ्यात अनेक वेळा वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे खरेदीदार व्यापाऱ्यांनी आम्हाला नियमावर बोट ठेवण्यास भाग पाडू नये असा इशारा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद काकांडीकर, सचिव बालाजी पाटील भायेगावकर, उपाध्यक्ष शिवाजीराव वासरीकर यांनी दिला.