महाराष्ट्र हेडलाईन्स : Best Times to Drink Water : मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. आपल्या शरीराचा ७० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे, त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी पाण्याशिवाय पर्याय नाही. डोक्यावरील केसांपासून ते पायांवरील नखांपर्यंत सर्व अवयव निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे इथपर्यंत ठीक आहे, पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? याविषयीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास त्याचे आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ शकतात, त्यामुळे आपण आहाराबाबत जसे नियम पाळतो तसे पाणी पिण्याबाबतही काही नियम आवर्जून पाळले पाहिजेत. याच विषयावर जीवा आयुर्वेदाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. (Drinking water at 'this' time has benefits for the body)
डॉ. प्रताप चौहान म्हणाले की, आपण अनेकदा पाणी कसे आणि केव्हा प्यावे याबाबतच्या सोप्या आणि छोट्या सवयी विसरतो. आयुर्वेदानुसार, पाणी केवळ तहान भागवणारे नाही तर ते एकप्रकारे औषध आहे. ते शरीराचे कार्य सुरळीत करते. योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते, शरीरास ऊर्जा मिळते. यामुळे रोज योग्य वेळी पाणी प्यायल्यास एखाद्या व्यक्तीला खरोखरच बरे होण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. चौहान म्हणाले.
रोज ‘या’ पाच वेळेत पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर (Best Times to Drink Water)
१) सकाळी उठल्यानंतर
सकाळी झोपेतून उठल्यानंतर इतर काहीही करण्यापूर्वी रोज एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पचनाक्रिया सुधारते, दिवसभर मन एकाग्र राहते, असे डॉ. चौहान म्हणाले.
२) जेवणाच्या ३० मिनिटे आधी
जेवणापूर्वी सुमारे १०-२० मिनिटे आधी थोडे कोमट पाणी प्या. डॉ. चौहान म्हणाले की, यामुळेही तुमची पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अग्नि (पाचक अग्नी) तयार होण्यास मदत होते. जेवताना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका, कारण यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो असेही डॉ. चौहान म्हणाले.
३) जेवणानंतर एक तासाने
जेवणानंतर पोषकतत्त्वांचे शोषण आणि हलके डिटॉक्सिफिकेशन सुलभ करण्यासाठी तुम्ही एक छोटा ग्लास कोमट पाणी पिऊ शकता, यामुळे खाल्लेलं अन्न चांगल्याप्रकारे पचते.
४) तुम्हाला खूप तहान लागते तेव्हा
डॉ. चौहान म्हणाले की, अशाप्रकारे दिवसभराचे पाणी पिण्याचे वेळापत्रक फॉलो करा, याशिवाय तुम्हाला खूप जास्त तहान लागते तेव्हा पाणी पिणे गरजेचे आहे.
जर तुम्ही सतत एक एक घोट असे पाणी पित असाल तर यामुळे कफ ऊर्जेचे असंतुलन होऊ शकते आणि कदाचित तुम्हाला अस्वस्थ, जड किंवा आळसवाणे वाटू शकते, असेही डॉ. चौहान म्हणाले.
५) अंघोळीपूर्वी आणि झोपण्यापूर्वी
डॉ. चौहान म्हणाले की, अंघोळीच्या एक तास आधी एक छोटा ग्लास पाणी प्यायल्यास रक्ताभिसरण क्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच झोपण्यापूर्वी एक छोटा ग्लास पाणी प्यायल्यास मज्जासंस्थेला स्थिर करण्यास मदत होते, यामुळे रात्रभर झोपेत असताना शरीर चांगल्याप्रकारे रिचार्ज होऊ शकते, असे डॉ. चौहान म्हणाले.
‘या’ गोष्टींची घ्या काळजी :
डॉ. चौहान यांनी सल्ला दिला की, पाणी पिताना नेहमी बसून प्यावे. गटगट नाही तर घोट घोट पाणी प्या. शक्यतो कोमट पाणी प्या, थंड पाणी पिऊ नका. हा एक छोटासा बदल आहे, परंतु अशाप्रकारे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात, मनःस्थितीवर आणि एकूणच आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतील, असे डॉक्टर चौहान म्हणाले.