महाराष्ट्र हेडलाईन्स : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय व सिटीस्कॅन मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आ. श्रीजया चव्हाण यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. (Nanded to get MRI and CityScan machines soon! ; Medical Education Minister assures)
भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय मांडला. त्यावरील उत्तरात हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य सरकारने पीपीपी धोरणानुसार एमआरआय व सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या सर्व विभागात निविदा प्रक्रिया सुरू आहेत. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे ३०० विद्यार्थी क्षमतेचे वस्तीगृहाचे काम लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी आ. चव्हाण यांनी याप्रसंगी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जनरल फिजिशियन अनिवार्य करा! :
आ. श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका जनरल फिजिशियनची नियुक्ती अनिवार्य करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत शासनाचे स्थायी धोरण आहे. मात्र, ग्रामीण भागात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती दिसून येत नाही. आपात्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्यास अथवा संबंधित क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने उपचार मिळत नाहीत. राज्य सरकारने धोरण म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका सर्वसाधारण वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य केल्यास आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने उपचार मिळू शकेल आणि हेळसांड टळू शकेल.