महाराष्ट्र हेडलाईन्स : मागील चार दिवसांपूर्वी नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालयात (hospital) उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या मधुमेह (शुगर)च्या एका रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा नांदेड जिल्ह्यातील कंधार ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल एका महिला रूग्णाच्या अंगावर उंदराचा वावर असलेला व्हिडिओ शुक्रवारी (दि.१) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्हीही घटनेत रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागावर खापर फोडून नामानिराळे झाले आहे. (Shocking....! Rats are playing on a patient's body in a rural hospital; Watch the viral video)
नांदेड जिल्हा रुग्णालय परिसरातील जीर्ण व बंद अवस्थेतील आठ इमारतींमुळे उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे सांगण्यात आले. तर, कंधार ग्रामीण रुग्णालयाची इमारत ही जुनी झाल्याने कारण या ठिकाणी पण उंदरांचा सुळसुळाट असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण :
कंधार ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे आहे. या ठिकाणी ओपीडीमध्ये तालुक्यातून अडीशे ते तीनशे रुपये दररोज येतात. या रुग्णालयात आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच बऱ्यापैकी सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांचा ओढा जास्त प्रमाणात असतो सध्या सहा रुग्ण उपचारासाठी दाखल (अॅडमीट) झाले आहेत. शुक्रवारी महिलांच्या वार्ड मध्ये एका रुग्णाच्या अंगावर उंदीराचा वावर असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयातील गलथान पण समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून याचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बांधकाम विभागाला महिनाभरापूर्वी पाठवले पत्र :
कंधार ग्रामीण रुग्णालयात नियमित साफसफाई केली तरी उंदरांचा सुळसुळाट आहे. रुग्णांचे नातेवाईक जेवण केल्यानंतर उरलेले अन्नपदार्थ डस्टबिन मध्ये न टाकता इतरत्र टाकतात. तसेच रुग्णालयाची इमारती जुनी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी उंदराचं प्रमाण वाढले आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला महिनाभरापूर्वी पत्र पाठवले आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम यांनी सांगितले.